पाच लाख द्या, गुन्ह्यातील कारवाई थांबवा; लाचखोर पोलिस उपनिरीक्षकाविरुध्द गुन्हा दाखल
पुणे : वीज मीटर चोरीच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाविरुध्द चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधकच्या (एसीबी) पुणे विभागाने शुक्रवारी (दि. १७ मे) ही कारवाई केली. तान्हाजी सर्जेराव शेगर(पोलीस उप निरीक्षक, वर्ग-२, चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर) असे त्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महावितरण विभागात नोकरीस आहेत. तक्रारदाराविरुध्द चंदननगर पोलिस ठाण्यात वीज मीटर चोरीचा गुन्हा दाखल आहे. या पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक शेगर यांनी पुढील कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली.
तडजोडीअंती तीन लाख रुपये लाचेची मागणी केली, असा अर्ज तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात दिला. ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी केली. त्यात शेगर यांनी लाच मागितल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाले. त्यावरून चंदननगर पोलिस ठाण्यात शेगर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक रूपेश जाधव करीत आहेत.