कापूरहोळ येथे भरदिवसा घरफोडी करून सव्वा दोन लाखांच्या दागिन्यांची चोरी; संशयितांवर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कापूरहोळ : साईस्पर्श अपार्टमेंट(कापूरहोळ, ता. भोर) येथे दिवसा ढवळ्या झालेल्या घरफोडित तब्बल २ लाख २५ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अमोल आण्णा गाडे(वय ३६ वर्ष, रा. कापूरहोळ ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेबाबत फिर्यादी यांनी प्रकाश वामन पोळ, शुभम प्रकाश पोळ, संगिता प्रकाश पोळ(तिघेही रा. कापूरहोळ ता. भोर जि. पुणे) आणि दत्ता विटकर(रा. निगडे ता. भोर) यांच्यावर चोरीचा संशय व्यक्त केला आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल गाडे हे कापूरहोळ येथील साईस्पर्श अपार्टमेंट येथे A3 विंग मध्ये पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १०४ मध्ये रहावयास असून गुरुवारी(दि. १६ मे) सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी ते कुटुंबासहीत काही कामानिमित्त पुणे शहरात गेले होते. काम आटोपून त्याच दिवशी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी ते घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर त्यांनी आत प्रवेश केला असता घरातील सामान आस्ताव्यस्त पडलेले दिसले. काही वेळाने त्यांना घराच्या लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने चोरी झाले असल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये दोन तोळे वजनाची सोन्याची चैन, सोन्याचा मिनी गंठण, कानातील सोन्याची झुमके व वेल असा एकूण २ लाख २५ हजार ५०० रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे. या चोरीबाबत फिर्यादी अमोल गाडे यांनी वरील चार जणांवर संशय व्यक्त करत त्यांच्या विरोधात आज शुक्रवारी(दि. १७ मे)फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांवर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णराज पवार करीत आहेत.