‘वन्यजीव सप्ताह’ निमित्ताने वनाविषयी जनजागृती करण्यासाठी भोर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
भोर : नव्या पिढीत निसर्ग आणि वन्यजीव याविषयी आस्था वाढत असून त्यांच्या अभिव्यक्तीस वाव देण्यासाठी व त्याद्वारे जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबरचा पहिला आठवडा हा ‘वन्यजीव सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येतो. यादरम्यान या सप्ताहा निमित्ताने एक ते सात ऑक्टोबर या कालावधीत भोर तालुक्यात वनाविषयी जनजागृती करणे, प्राण्यांची माहिती व कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. उपवनसंरक्षक पुणे महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक शितल राठोड, वनपरिक्षेत्र आधिकारी शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विविध ठिकाणी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यादरम्यान भोर येथील शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वनभोजन भोलावडे येथील वन उद्यानात आयोजित करण्यात आले होते. यावेळी वनरक्षक हिमोणे यांनी मुलांना दुर्मिळ प्राण्याविषयी व जैवविवीधते विषयी मार्गदर्शन केले. यावेळी वनपाल एस. एल. मुंढे, वनरक्षक व्ही. आर. आढागळे, वनरक्षक एस. ए. राठोड, वनरक्षक एस. एम. जाधव, वनसेवक साळुंखे व सणस उपस्थित होते.