सारोळा तलाठी सजातील अंधाधुंद कारभार उघडकीस; वारस नोंदीत टाकले अस्तित्वातच नसलेल्या व्यक्तीचे नाव

सारोळा : भोर तालुक्यातील किकवी मंडल अंतर्गत येणाऱ्या सारोळा तलाठी सजातील एक अंधाधुंद कारभार उघडकीस आल्याची घटना घडली आहे. यामध्ये चक्क वारस नोंदीत असणाऱ्या व्यक्तीचे नाव बदलून अस्तित्वातच नसलेल्या व्यक्तीचे नाव टाकल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार तत्कालीन तलाठी सुरेश नामदेव किरवले यांच्या कार्यकाळात घडला असून याचा विनाकारण त्रास स्थानिक शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेतकरी संजय साहेबराव साळुंके(रा. पांडे, ता. भोर) यांनी त्यांचे वडील साहेबराव लक्ष्मण साळुंके हे मयत झाल्यानंतर वारसनोंदीसाठी तहसीलदार कार्यालयात स्वतः, त्यांची आई आणि २ बहिणींच्या योग्य त्या कागदपत्रांसहित प्रतिज्ञापत्र केले. ते प्रतिज्ञापत्र साळुंके यांनी सारोळा सजात तत्कालीन तलाठी सुरेश किरवले यांच्याकडे जमा केले. त्यांनतर तलाठी यांनी स्थानिक पंचांसमक्ष याची खातरजमा करून नोंद घालण्यास घेतली असता त्या प्रतिज्ञापत्रावर असणाऱ्या व्यक्तींची नावे इंदुबाई साहेबराव साळुंके(मयत यांची पत्नी), संजय साहेबराव साळुंके(मुलगा), मंदा महादेव ढमाळ(मुलगी), नंदा दत्तात्रय बाठे(मुलगी) ही होती. परंतु नोंद घालताना तत्कालीन तलाठी किरवले यांनी आपल्या कामकाजाचे कोणतेही गांभीर्य न बाळगता अंधाधुंद कारभार करत वारस नोंदीतील क्रमांक ३ वर असणाऱ्या मंदा महादेव ढमाळ यांचे नाव गायब करून अस्तित्वात नसणाऱ्या व्यक्तीचे नाव टाकले. ही बाब मयत साहेबराव साळुंके यांचा मुलगा शेतकरी संजय साळुंके हे जेव्हा सातबारा उतारा काढण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनतर शेतकरी साळुंके यांनी सध्या सारोळा सजात रुजू असलेले तलाठी परमेश्वर जाधव यांना ही चूक निदर्शनास आणून दिली असता तुम्ही तसे आदेश तहसीलदार यांच्याकडून लेखी स्वरूपात आणण्यास तलाठी जाधव यांनी सांगितले.

Advertisement

त्यांनतर संबंधित शेतकरी तहसीलदार कार्यालयात गेले असता तहसीलदार सचिन पाटील यांनी शेतकऱ्याने केलेल्या अर्जावर “उचित कार्यवाही करावी” अशी टिपण्णी करून तो अर्ज संबंधित तलाठ्याकडे जमा करण्यास सांगितले. त्यांनतर संबंधित शेतकऱ्याने तो अर्ज तलाठी जाधव यांच्याकडे शुक्रवारी(दि. १७ मे) दुपारी साडे बारा वाजता जमा केला. तसे करत असताना त्यावर तलाठी जाधव यांनी त्वरित दुरुस्ती करणे उचित होते. परंतु तसे न करता तलाठी जाधव यांनी संबंधित शेतकऱ्यास कार्यालयात थांबण्यास सांगून “मी कामानिमित्त बाहेर चाललो असून काही वेळात परत येतो” असे सांगून निघून गेले. त्यांनतर दोन तासाने म्हणजे अडीच वाजता तलाठी जाधव हे कार्यालयात आले असता. “काय असेल ते सोमवारी बघू” असे म्हणून पुन्हा एकदा कामानिमित्त कार्यालयातून निघून गेले. त्यानंतर संबंधित शेतकरी शासकीय कार्यालयाच्या वेळेपर्यंत त्यांची वाट पाहत राहिले. संबंधित शेतकऱ्याने तलाठी जाधव यांस संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला परंतु त्यांचा संपर्क काही होऊ शकला नाही.

या संपूर्ण प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्याला मात्र मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा भरमसाठ पगार घेऊन आपल्या कामकाजाचे गांभीर्य न ठेवणाऱ्या तत्कालीन तलाठ्यांवर योग्य ती कारवाई करून शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page