सातारा-पुणे महामार्गावर कामथडी गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी महिलेचा मृत्यू
कापूरहोळ : सातारा-पुणे महामार्गावर कामथडी (ता.भोर) गावच्या हद्दीत पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत रस्ता क्रॉस करत असणाऱ्या अनोळखी महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. केतन हनुमंत शेटे(वय २७ वर्ष, रा. नसरापुर, ता भोर) यांनी याबाबत राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी(दि.२३ मार्च) सायंकाळी ७:३० च्या सुमारास सातारा-पुणे महामार्गावर कामथडी (ता.भोर) गावच्या हद्दीतील हॉटेल दख्खन पठार समोर सातारा बाजू कडून पुणे बाजू कडे जाणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अनोळखी महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस व महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. राजगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून भोर उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सदर महिलेचे वय ४० ते ४२ असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अद्याप पर्यंत या महिलेची ओळख पटलेली नाही. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुतनासे करीत आहेत.