जेवण करण्याच्या बहाण्याने पेंजळवाडीतील शेतकऱ्याचे अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न; राजगड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
सारोळा : भोर तालुक्यातील पेंजळवाडी येथील शेतकऱ्याला जेवण करण्याच्या बहाण्याने अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पेंजळवाडी येथे घडला आहे. संतोष रामचंद्र चव्हाण(वय ४६ वर्ष, रा. पेंजळवाडी, ता. भोर) यांनी याबाबत शुक्रवारी(दि. १८ मे) रात्री उशिरा राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष चव्हाण यांना मंगळवारी(दि. १४ मे) शिरवळ(ता. खंडाळा) येथे जेवण करण्याचा बहाणा करत आदेश बोबडे(रा. राजापुर ता. भोर) आणि सोपान जाधव(रा. भोंगवली ता. भोर) यांनी पेंजळवाडी येथून त्यांच्या ताब्यातील कार क्रमांक एम.एच.१२ यु.एफ.२५२२ यामध्ये जबरदस्तीने बसवून नेले. तिथे गेल्यावर फिर्यादी चव्हाण यांस “तुझा मित्र दादा चव्हाण कुठे आहे? तू आम्हाला त्याची माहिती देत नाही” म्हणून आदेश बोबडे, सोपान जाधव आणि अमोल घाडगे यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्यांच्याजवळ असलेले २६ हजार रुपये बळजबरीने काढुन घेतले व हाताने, लाथाबुक्कांनी तसेच स्टिलचे बाटलीने हातापायावर मारहान करत दुखापत केली. त्यानंतर त्यांच्या तावडीतून फिर्यादी चव्हाण हे नजर चुकवून पळून आले असल्याचे राजगड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत त्यांनी नमूद केले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अजित पाटील करीत आहेत.