भोर तालुक्यातील गुनंद गावात वीज कोसळून म्हैस व रेडकुचा मृत्यू
भोर : भोर तालुक्यातील गुनंद गावात विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे वीज कोसळून एक म्हैस व म्हशीचे रेडकू दगावल्याची घटना घडली आहे. नैसर्गीक आपत्तीमुळे पशुधनाची जिवीत हानी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुनंद(ता.भोर) येथे आज बुधवारी(दि. ५ जून) दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान झालेल्या पावसात अचानक वीज कोसळून सुभाष विनायक निगडे (रा. गुनंद, ता.भोर) या शेतकऱ्याची चारा चरायला गेलेल्या एक म्हैस व म्हशीचे रेडकू यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये शेतकऱ्याचे १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक तलाठी धम्मदिप शिखरे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी घटनेचा पंचनामा केला असून शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचे आश्वासन दिले आहे.