महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! शाळांजवळ ५०० मीटरच्या परिघात ‘कॅफिनयुक्त’ एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर घालण्यात येणार बंदी
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र सरकार कॅफिनयुक्त एनर्जी ड्रिंक्स संदर्भात मोठा निर्णय घेणार आहे. राज्यातील शाळांच्या ५०० मीटरच्या परिघात उच्च कॅफिन सामग्री असलेल्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालणारा आदेश लवकरच जारी करणार आहे. महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज शुक्रवारी(दि. १२ जुलै) विधान परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धर्मरावबाबा आत्राम यांनी हे आश्वासन दिले. MFDA लवकरच राज्यातील शाळांच्या ५०० मीटरच्या परिघात उच्च कॅफीन सामग्री असलेल्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालणारा आदेश जारी करेल. सध्याच्या नियमांनुसार, एक लिटर कार्बोनेटेड किंवा नॉन-कार्बोनेटेड पेयांमध्ये १४५ मिली आणि ३०० मिली दरम्यान कॅफिनचे प्रमाण अनुमत आहे, असं आत्राम यांनी सांगितलं. कौन्सिलच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी आत्राम यांना बंदी घालण्यात येणाऱ्या पेयांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरातील MFDA अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.