भोरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांना पैसे वाटणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा भोर पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन छेडू : आमदार संग्राम थोपटे
भोर : बारामती लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या अगोदरच्या रात्री भोर शहरातील मतदारांना आचारसंहिता सुरू असताना पैसे वाटणाऱ्या मावळ तालुक्यातील व भोर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर तात्काळ कारवाई करा. अन्यथा भोर पोलीस स्टेशन समोर आंदोलन छेडण्याचा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने भोर, राजगड, मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी आज बुधवारी(दि. ५ जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी बोलताना आमदार थोपटे म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या बारामती लोकसभा निवडणूकीत दि. ०६ मे रोजी रात्री भोर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मावळ तालुक्यातील व भोर शहरातील कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटप करुन मतदारांना आमिष दाखवत होते. त्याबाबत भोर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाचे भरारी पथक क्र. ३ यांनी पैसे वाटप करताना सापडलेली वाहने आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यावर दि. ७ मे रोजी एनसीआर दाखल केली. परंतु वास्तविक या केसमध्ये रितसर गुन्हा दाखल करणे आवश्यक होत्ते. पण असे न करता केवळ एनसीआर दाखल केली. तसेच सापडलेल्या गाड्यांचा घटनास्थळी पंचनामा केला नसून सदरील गाडयांमध्ये असलेल्या पैशाच्या पिशव्या व अस्तव्यस्त पडलेल्या नोटांचे बंडल जप्त केले नाहीत. सदरील पैशाच्या पिशव्या व सदरचे पैसे नेमके कुठे गेले? याचा तपास झालेला नसल्याचे दिसत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, घडयाळ चिन्हाच्या प्रचाराचे साहित्य व रक्कम फक्त एक हजार एकशे साठ रुपये जप्त दाखवली. तसेच सदर आरोपींना अटक न करता त्यांच्याकडे पैसे कोठून आले याबाबत आजपर्यंत तपास केला गेला नाही. सदरील घटनेतील वाहने ही भोर शहरात कोणत्या मार्गे आली? त्या चेक नाक्यांवरील तपासणी पथकाने छायाचित्रण करुन त्यामधील असलेल्या रकमेचे चित्रीकरण केले किंवा नाही याबाबतचा तपास अद्यापपर्यंत का केला गेला नाही? तसेच या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक आयोग यांच्याकडे याबाबतचा कोणताही अहवाल सादर केलेला नाही, त्यामागील कारणे काय आहेत? असे प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केले.
तसेच या घटनेतील काही आरोपी रोज भोर पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी, सासवड व मा. पोलीस अधिक्षक, पाषाण, पुणे यांच्याकडे खोटया तकारी दाखल करण्या करिता जात असूनसुध्दा त्यांच्याकडे व वडगांव मावळ येथील आरोपींकडे सदर गुन्हयाबाबत आजपर्यंत कोणतीही चौकशी केली नाही, उलटपक्षी महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना खोटया गुन्हात अडकवून त्रास देण्याचे षडयंत्र रचत आहेत. या सर्व मुद्यांबाबत पोलीस स्टेशनकडून काय कारवाई झाली वा करण्यात येत आहे? तसेच या गुन्ह्यांबाबत चौकशीला विलंब होण्याची कारणे काय आहेत? याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई अतितात्काळ करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने महाविकास आघाडीच्यावतीने भोर पोलीस स्टेशनसमोर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आमदार संग्राम थोपटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.