वेल्ह्यातील दोन पैलवानांनी पटकावले उत्तर प्रदेश येथे कांस्यपदक
वेल्हे : उत्तर प्रदेश येथील नोएडा या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत वेल्हे तालुक्यातील दापोडे गावचा अथर्व कैलास शेंडकर व सध्या न्हावी १५(ता. भोर) येथे रहावयास असलेला मूळचा वाजेघर(ता. वेल्हे) येथील यश योगेश नलावडे यांनी कांस्यपदक पटकावले आहे. अथर्वने १५ वर्षाखालील ८६ किलो वजन गटात ही कामगिरी केली आहे तर यशने १५ वर्षाखालील ६८ किलो वजन गटात कांस्यपदक मिळविले आहे.
पुणे शहर तर्फे खेळणारे अथर्व शेंडकर आणि यश नलावडे हे मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल येथील SAI बॅचचे कुस्तीगीर असून ते वस्ताद पै. ज्ञानेश्वर (माऊली) मांगडे आणि SAI बॅचचे शासकीय कुस्ती कोच पै. वरूण त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. त्याचबरोबर चंद्रशेखर धुमाळ, मनोहर मांगडे, संजय खांडेकर, कृष्णा फिरंगे, अमोल शेडगे यांचेही मोलाचे मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी मिळत असते. कुस्ती स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल दोघांवर वेल्हे व भोर तालुक्यातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.