“ससून” रुग्णालयातून भोरचा रुग्ण पळाला अन् “ससून” रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाने पलायन केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ससून रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सलाईन लावलेली सुई हाताला असून सुद्धा गेटमधून जाताना सुरक्षा रक्षकाचे त्याकडे कसे लक्ष गेले नाही? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ससून रुग्णालयाचा सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. विठ्ठल बापूराव ढवळे(वय ३५ वर्ष रा.भोर) असे या रुग्णाचे नाव आहे. याबाबत रुग्णाच्या पत्नी उषा ढवळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २९ मे रोजी कावीळ तसेच फिट येण्याचा त्रास त्यांना होत असल्याने विठ्ठल ढवळे यांना उपचारासाठी त्यांच्या पत्नी उषा ढवळे यांनी ससून रुग्णालयात दाखल केले होते. या दरम्यान वार्ड नं ४० आपत्कालिन विभाग येथे प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी वार्ड नं ३ मध्ये पुढील उपचाराकरीता विठ्ठल ढवळे यांना दाखल केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास वॉर्डमधील साफ सफाईसाठी रुग्णाच्या नातेवाईकांना तेथील कर्मचाऱ्यांनी बाहेर उभे राहण्यास सांगितले. त्यामुळे उषा ढवळे देखील वॉर्डच्या बाहेर येवून थांबल्या होत्या.
त्यानंतर साधारण १० वाजण्याच्या सुमारास उषा ढवळे या वॉर्डात गेल्या असता तेथे त्यांचे पती विठ्ठल ढवळे हे त्यांना दिसले नाहीत. यानंतर त्यांनी संपुर्ण ससून हॉस्पीटल परिसर तसेच बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसर व आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला असता त्यांचे पती त्यांना आढळून आले नाही. यांनतर त्यांनी याबाबत ससून रुग्णालय प्रशासनाला माहिती दिली असता त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कोणीही लक्ष न दिल्याने अखेर चार दिवसांनंतर उषा ढवळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन पती विठ्ठल बापुराव ढवळे हे हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. बंडगार्डन पोलिसांतर्फे पुढील तपास सुरू आहे.