रस्ता आहे की घसरगुंडी? बुवासाहेब वाडी येथील रस्त्याची परिस्थिती, प्रवाशांचे हाल

भोर : कापूरहोळ-भोर रस्त्याचे काम सुरू असून दोन-तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुवासाहेब वाडी (ता. भोर) येथील रस्ता उकरलेल्या ठिकाणी चिखल झाला आहे. यामुळे वाहने रस्त्यावरून घसरत असून रस्त्याला घसरगुंडीचे स्वरूप निर्माण झाले आहे. गेल्या एक वर्षापासून कापुरव्होळ-भोर-वाई या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील बुवासाहेब वाडी  येथील वळणा शेजारी मोरीचे बांधकाम सुरू असून त्याला पर्यायी रस्ता पूर्व बाजूने तयार केला आहे. हा पर्यायी रस्ता मुरूम मातीचा असल्याने पावसामुळे येथे मातीचा चिखल झाला आहे. ही माती चिकट असल्याने वाहने रस्त्यावरून घसरत आहेत.

Advertisement

सदर रस्त्यावरून वाहने घसरत असल्याने वाहने मंद गतीने जात आहेत तर दुचाकीस्वरांना दुचाकी चालवणे फारच मुश्किल झाले आहे. शाळकरी मुलेही या रस्त्यावरून पायी जात असून या मुलांना चिखलातून रस्ता शोधावा लागत आहे. शेजारून जाणारी वाहने घसरत असल्याने वाहन अंगावर येते की काय? अशी मनात भीती निर्माण होत आहे. गेल्या तीन महिन्यापासून बुवासाहेब वाडी येथील मोरीच्या कामासाठी पर्यायी रस्ता तयार केला आहे. या मोरीचे काम काही दिवस बंद होते. यामुळे मोरीच्या कामाला विलंब लागला. हा पर्यायी रस्ता मुरूम व चिकट मातीचा असल्याने पावसामुळे या ठिकाणी घसरगुंडीचे स्वरूप निर्माण झाले आहे.

सध्या पाऊस काळ असल्याने या रस्त्यावरून जाणे धोकादायक झाले आहे. परंतु दुसरा पर्याय नसल्याने नाईलाजास्तव वाहने याच रस्त्यावरून जात आहेत. गेल्या तीन महिन्यापासून मोरीच्या कामासाठी रस्ता उकरला होता. जर ठेकेदार कंपनीला या ठिकाणचे काम लवकर करायचे नव्हते तर रस्ता उकरलाच कशाला? असा संतप्त सवाल हैराण झालेले वाहन चालक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page