भोर – सतरा वर्षीय अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह विहिरीत सापडला
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील धांगवडी(ता.भोर) येथील राजगड ज्ञानपीठ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह पारवडी(ता.भोर) गावातील विहिरीमध्ये सापडला असून आयुष सतीश लिम्हन(वय १७ वर्ष, रा. पारवडी,ता.भोर) असे या मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आयुष लिम्हन हा पुणे-सातारा महामार्गावरील धांगवडी येथील राजगड ज्ञानपीठ इंजीनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. यादरम्यान बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजता हा मुलगा राहत्या घरातून कॉलेजच्या बसने कॉलेजला निघून गेला. परंतु रात्री उशिरा पर्यंत तो घरी आला नसल्याने त्याचे वडील सतीश दत्तात्रय लिम्हण(वय ५४ वर्ष) यांनी बुधवारी(दि. २५ सप्टेंबर) अपहरणाचा संशय व्यक्त करत रात्री उशिरा राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यांनतर या मुलाचा मृतदेह पारवडी गावातीलच एका विहिरीमध्ये आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राजगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शुभविच्छेदनासाठी भोर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास राजगड पोलिसांकडून सुरू आहे.