सावधान..! पुण्यावर ढग जमले; फ्लॅशफ्लडसारख्या परिस्थितीचा अंदाज; ‘सतर्क’ चा इशारा
पुणे : राज्यातील वातावरणात बदल झाले असून मॉन्सूनचे राज्यात आगमन झाले आहे. पावसाने कोकण आणि पुण्यात जोरदार बॅटिंगला सुरुवात केली आहे. आता पावसासाठी राज्यात पोषक वातावरण असल्याने मॉन्सूनची आगेकूच वेगात सुरू आहे. नागरिक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होते. त्याचे दमदार आगमन होताच नागरिकांची धांदल उडाली आहे. तसेच सतर्कने पुणे शहर व जिल्ह्यात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
संपूर्ण पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पुण्यातील विविध परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पहिल्याच पावसात पुणेकरांचे मेगा हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. ११ जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. पुण्यासाठी सर्तकने इशारा दिला आहे. पुण्यावर उंच ढगांची निर्मिती सुरू असून, कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने काही ठिकाणी फ्लॅशफ्लड सारखी स्थिती, तसेच झाडे पडणे, भिंती पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटना शक्य. पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कमी वेळात जास्त पाऊस सुरू असताना वरंध घाटातून प्रवास टाळावा. घाट रस्त्यावर डोंगरावरून दगड निसटून येण्याची शक्यता आहे, असेही सतर्कने म्हटले आहे.
हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. संततधारेसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, गोवा येथे विजांसह पावसाची शक्यता आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, बीड येथेही पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.