नसरापूर येथील बागमार ज्वेलर्सच्या मालकासह इतर ३ जणांवर राजगड पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
नसरापूर : जमिनीच्या वादातून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नसरापूर(ता.भोर) येथील “बागमार ज्वेलर्स”चे मालक योगेश देवीचंद बागमार, गौरख देवीचंद बागमार, योगेश नंदु राजे(तिघेही रा. नसरापुर, ता. भोर) तसेच रवी मांढरे(रा. कामथडी, ता. भोर) यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पांडुरंग राघु गायकवाड(वय ४० वर्ष, रा. नसरापुर, ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांडुरंग गायकवाड यांच्या वडीलांनी खरेदी केलेल्या माळेगाव(ता. भोर) येथील गट नं. १७९ मधील ३ गुंठे जमीनीला असलेल्या कंपाऊंडच्या पोलची संशयित आरोपी योगेश देवीचंद बागमार याने दि. १२ मे २०२४ रोजी तोड फोड करुन अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला असून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना सदर जागेत येऊ न देता जाती वाचक शिविगाळ करुन धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
तसेच दि. २५ मे २०२४ रोजी त्याच जागेत फिर्यादी गायकवाड यांनी कंपाऊड व शेड उभे करण्यासाठी आणलेल्या खेड-शिवापूर येथील कामगारांना गौरव देवीचंद बागमार, योगेश नंदु राजे, रवी मांढरे यांनी नसरापुर येथील एस. टी. स्टॅन्ड जवळ अडवून तेथील योगेश हॉटेल मध्ये नेऊन ‘सदर जागेत काम करायचे नाही, येथून निघून जा’ असे म्हणुन बांबु, खराटा, व लाथा बुक्क्याने मारहान केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. ही तक्रार गायकवाड यांनी उशिरा शनिवारी(दि. २१ जून) राजगड पोलीस ठाण्यात दिली आहे. या सर्व घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे करीत आहेत.