सावित्रीबाईंची नायगावनगरी सजली; १९३ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंसहीत उपमुख्यमंत्री व अनेक मंत्री राहणार उपस्थित
नायगाव : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नायगाव (ता. खंडाळा) येथे उद्या बुधवार, ३ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहाने साजरी होणार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने नायगावनगरी सजली आहे. स्मारकास विद्युतीकरण करण्यात आले असून, सर्व स्मारक फुलांनी सुशोभित करण्यात आले आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंती निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई, गृहनिर्माण मंत्री मागास बहुजन कल्याण विभाग अतुल सावे, अ.पा.आ.मा. विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, महिला आयोग अध्यक्ष रुपलीताई चाकणकर तसेच विविध लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य व शासकीय अधिकारी नायगाव येथे उपस्थित राहणार आहेत.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त नायगाव (ता. खंडाळा) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामधे सकाळी ८:३० ते १० सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघेल. त्यानंतर १० वाजता सावित्रीमाई फुले स्मारकास मान्यवरांची भेट. १० वाजून १० मि. सावित्रीमाई फुले शिल्पसृष्टी येथे भेट व सभागृह नूतनीकरण कामाचे लोकार्पण, नंतर मुख्य कार्यक्रम स्थळी अभिवादन सभा, तसेच उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान, महिलांसाठी कायदे व आरोग्यविषयक मार्गदर्शन, महाज्योती व ओबीसी विकास महामंडळ यांच्या योजनांचे मार्गदर्शन आणि शेवटी “सत्यशोध” ज्ञा. सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित नाटक होणार आहे.