वरिष्ठांच्या आशीर्वादाने राज्यभरातील १५६ लाचखोर अजूनही खुर्चीत; कारवाई होऊनही निलंबन नाही

निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : लाचखोरीच्या कारवाईत अडकलेल्यांंवर निलंबन, बडतर्फची कारवाई करण्यास प्रशासनाला मुहूर्त मिळत नसल्याची धक्कादायक माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. राज्यभरातील १५६ लाचखोर अजूनही कर्तव्यावर हजर आहेत. त्यामध्ये दोषी ठरवूनही १६ जणांवर बडतर्फची कारवाई केलेली नाही.

गेल्यावर्षी लाचखोरीप्रकरणी राज्यात ८१२ गुन्ह्यांची नोंद झाली. यावर्षी ४ जुलैपर्यंत ३९४ गुन्ह्यांची नोंद होत ५८१ जणांवर कारवाई झाली. लाचखोरीला आळा घालण्यासाठी तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे हे लाचखोर वर्षानुवर्षे तेथेच चिटकून आहेत.

लाचखोरांना बळ
२०१३ पासून आतापर्यंत लाचखोरीप्रकरणी कारवाई होऊनही १५६ लाचखोरांचे निलंबन झालेले नाही. यात सर्वाधिक मुंबईतील ४३ जणांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ ठाणे (३२) आणि औरंगाबाद(२१) चा क्रमांक लागतो.

Advertisement

यापूर्वी नागपूरमधील सर्वाधिक लाचखोरांचा यात समावेश होता. तोच आकडा ११ वर आला आहे. कारवाई दाखविण्यासाठी काहींची बदली करण्यात आली आहे. मात्र लाचखोरीच्या प्रकरणात अडकूनही कारवाई होत नसल्याने लाचखोरांना आणखी बळ मिळत आहे.

कुठल्या विभागाचे किती?
ग्रामविकास (१२) , शिक्षण क्रीडा (४०), महसूल/नोंदणी/ भूमिअभिलेख (१६), सहकार पणन व वस्त्रोद्योग (२), नगरविकास (३४) आणि पोलिस होमगार्ड, कारागृह विभागातील (२१) सह अन्य विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

दोषी ठरवूनही १६ जण बडतर्फ नाही
५ जुलैपर्यंत दोषी ठरवूनही १६ जणांना बडतर्फ केलेले नाही. यामध्ये ठाणे, पुणे प्रत्येकी १, नाशिक (३), नागपूर (४), अमरावती (२), औरंगाबाद (२) आणि नांदेड (३) असा समावेश आहे. यामध्ये ‘क्लास टू’मधील ४, तर ‘क्लास थ्री’मधील १२ जणांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page