नोकरी सोडल्यानंतर जुना लॉगइन आयडी वापरून कंपनीला १७ लाखांचा गंडा
हडपसर : ट्रॅव्हल्स कंपनीच्या नावे तिकिटे घेऊन कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत निखील देविदास फाटेकर (वय ३६ वर्ष, रा. ग्रीन हाय सोसायटी, भेकराई डेपो जवळ, फुरसूंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अमरजित सिंग कुलवंत सिंग (वय ३४ रा. अमृतसर, पंजाब) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये कामाला आहेत. आरोपी अमरजित सिंग हा देखील कंपनीत कामाला होता. त्याने काम सोडून राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर आरोपी कंपनीच्या नावावर तिकिटे विकत होता. दरम्यान, त्याने जुना लॉगइन आयडी वापरुन कंपनीच्या सॉफ्टवेअरचा अनधिकृत वापर करुन तब्बल १७ लाख ८८ हजार रुपये किंमतीची ११ तिकिटे विकली. या तिकिटांसाठी त्याने कंपनीच्या बँक खात्यात असलेली रक्कम वापरली. कंपनीची परवानगी न घेता परस्पर तिकिटांची विक्री केल्याने आरोपी अमरजित याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वास डगळे करीत आहेत.