जमिनीच्या व्यवहारातून खून; मुळशीतील ६४ वर्षीय आरोपीला जन्मठेप

मुळशी : मौजे वळणे (ता. मुळशी) येथील जमीन खरेदी-विक्री व्यवहाराच्या कारणावरून एकावर धारदार हत्याराने वार केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने जन्मठेप व ३ लाख रुपयांची शिक्षा ठोठावली. तसेच दंडाच्या रकमेपैकी २ लाख रुपये मृत व्यक्तीच्या पत्नीला देण्यात यावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला.

सुरेश उर्फ बाळासाहेब बापूराव सातपुते (वय ६४, रा. बावधान, पुणे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विलासराव पुंडलिकराव साबणे असे मृताचे नाव आहे. त्यांची पत्नी विद्या साबणे यांनी पौड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. ही घटना दि. ७ नोव्हेंबर २०१९ मध्ये घडली. दीड वर्षापूर्वी विलासराव साबणे यांना त्याच्या मित्राने मौजे वळणे (ता. मुळशी) येथे राहणारे आरोपी सुरेश उर्फ बाळासाहेब बापूराव सातपुते याने जमीन विक्रीसाठी काढली असल्याचे सांगितले. पती-पत्नी साबणे जमीन पाहण्यासाठी आरोपीसमवेत गेले. त्यांना जमीन पसंत पडल्याने त्यांनी आरोपी सुरेश सातपुते याच्याशी व्यवहार केला. जमिनीची किंमत ९ लाख १० हजार रुपये निश्चित झाली. त्यानंतर व्यवहारापोटी त्यांनी आरोपीला १ लाख रुपये रोख आणि ४ लाख रुपये दिले. उरलेले पैसे खरेदीखत झाल्यावर वर्षाने द्यायचे ठरले. जागेची मोजणी ७ नोव्हेंबर २०१९ मध्ये आहे, असे आरोपीने फोनवर सांगितले. आरोपीने या दिवशी साबणे यांना फोन करून गाडी नसल्याने घेण्यास बोलावले. त्यानंतर साबणे यांना पत्नीने फोन केला असता, त्यांचा फोन स्वीच ऑफ लागला. आरोपीने देखील फोन बंद केला. साबणे यांच्या पत्नीने डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल केली.

Advertisement

यादरम्यान, डेक्कन पोलिसांना पौड पोलिसांनी वळणे येथे मृतदेह मिळाल्याचे सांगितले. हा मृतदेह साबणे यांचाच असल्याचे त्यांच्या पत्नी आणि मुलाने ओळखले. याप्रकरणात साबणे यांच्या पत्नीने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी बाजू मांडली. पौडचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव (सध्या जेजुरी पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण) यांनी तपास केला. पुणे सेशन कोर्ट पैरवी अधिकारी विद्याधर निचित, जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी आकाश पवार यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page