आता शेतसाराही भरा ऑनलाईन; भोर, वेल्हा आणि पुरंदर तालुक्यांतील गावांमध्ये पहिल्या टप्प्यात सुविधा होणार सुरू

भोर : महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्‍सच्या धर्तीवरच आता जमीनविषयक महसूल कर अर्थात शेतसारादेखील ऑनलाईन भरण्याची सुविधा भूमिअभिलेख विभागाने उपलब्ध करून दिली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील भोर, वेल्हा आणि पुरंदर तालुक्यांतील गावांमध्ये ही सुविधा येत्या आठवडाभरातच सुरू करण्यात येणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांना शेतसारा भरण्याची ऑनलाइन नोटीस बजावली जाणार असून, घरबसल्या कर भरण्याची सोय उपलब्ध होणार आहे. शेतसारा वसुलीसाठी तलाठ्यांना खातेदारांच्या घरोघरी फिरावे लागत होते, तसेच या कराची वसुली वेळेवर होत नव्हती. कधीकधी कर किती थकीत आहे, यांचीही माहिती खातेदारांना नसते.

या पार्श्‍वभूमीवर भूमिअभिलेख विभागाने संगणक प्रणाली विकसित केली. या सुविधेमुळे सर्व्हे नंबरनिहाय अथवा खातेदारनिहाय वार्षिक शेतसाऱ्याची रक्कम किती होत आहे, थकीत कर किती आहे, याची माहिती संगणकावर मिळणार असून, कर ऑनलाइन भरता येणार आहे.

Advertisement

भूमिअभिलेख विभागाने ई चावडी या संगणक प्रणालीमध्येच शेतीचा कर ऑनलाइन भरण्याची सुविधा देण्यासाठी काम सुरू केले आहे. https://echawadicitizen.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर शेतसारा भरता येणार आहे.

शेतीचा कर भरण्याबरोबरच बिनशेती कर अर्थात एनए करसुद्धा भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पहिल्या टप्प्यात भोर, वेल्हा आणि पुरंदर या तालुक्यांत ही सुविधा येत्या आठ दिवसांत दिली जाणार असून, उर्वरित तालुक्यांमध्ये ही सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

इंग्रजांपासून शेतसाऱ्यांची वसुली
शेतसारा हा पारंपरिक कर आहे. इंग्रजांच्या काळापासून जमिनींवर कर लावण्यास सुरुवात झाली. पूर्वी शेतसारा हा महसूल देणारा महत्त्वाचा कर होता. कालातरानंतर जशी प्रगती होत गेली. तसतशी नवनवीन कराची आकारणी सुरू झाली. मात्र, जमिनींवर आकारला जाणाऱ्या या कराची वसुली आजही सुरू आहे. जमिनीच्या क्षेत्रानुसार या कराची अंमलबजावणी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page