पुणे-सातारा महामार्गावर कामथडी गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर कामथडी(ता.भोर) गावच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी(दि. १८ जुलै) रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली. अमोद महेंद्र निंबाळकर(वय २५ वर्ष, रा. आनंदलहरी प्रशांत सोसायटी, विदया व्हॅली रोड, सुस पुणे) असे अपघातात मयत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत निलेश दिनकरराव हिंगे(वय ४९ वर्ष, रा. प्रणीती को. ऑ. हौसिंग सोसायटी, बाणेर रोड, पुणे) यांनी राजगड पोलीस ठाण्यात आज शुक्रवारी फिर्याद दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अमोद निंबाळकर हे त्यांच्या मोटरसायकल(एम. एच. 12 एच. एस. ८६९६) वरुन गुरुवारी सायंकाळी पुण्याच्या दिशेने निघाले होते. रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा महामार्गावर कामथडी(ता.भोर) गावच्या हद्दीतील हॉटेल राजतोरण मिसळ समोरून जात असताना त्यांच्या दुचाकीला कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या नंतर अज्ञात वाहनचालक तेथून पसार झाला असून तोच अमोद निंबाळकर यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याबाबतची फिर्याद निलेश हिंगे यांनी राजगड पोलीस ठाण्यात दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार जगदीश शिरसाठ करीत आहेत.