भोर येथील शनि घाट परिसरात आढळलेला मृतदेह शिवरे येथील महिलेचा
भोर : शहरातील शनि घाट परिसरात निरा नदीच्या पात्रात रविवारी(दि. ७ एप्रिल) एका विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. अखेरीस ‘तो’ मृतदेह शिवरे येथील विवाहित महिलेचा असल्याचे निष्पण झाले आहे. रेखा सीताराम उकिरडे(वय ३५ वर्ष, रा.शिवरे ता.भोर) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत मृत रेखा यांचे भाऊ अनिल ज्ञानोबा भिसे(रा.वेताळ पेठ, भोर) यांनी भोर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अनिल भिसे यांच्या बहीण असलेल्या मृत रेखा उकिरडे या रविवारी(दि. ७ एप्रिल) दुपारी सासरी शिवरे येथे जाते असे सांगून घरातून निघून गेल्या. काही वेळानंतर भिसे यांना ओळखीच्या व्यक्तीने फोन करून सांगितले की, शहरातील तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस वाहणाऱ्या नीरा नदी पात्रात शनि घाट परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळला असून त्यांचा चेहरा तुमच्या बहिणीशी मिळता-जुळता आहे. भिसे यांनी तत्काळ भोर पोलिसांना संपर्क केला. तसेच उपजिल्हा रुग्णालयात समक्ष जाऊन मृतदेहाची खातरजमा केली असता तो त्यांच्या बहिणीचा असल्याचे निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मोरे करीत आहेत.