रस्ताच नाही जागेवर तर टोल का भरायचा? खेड शिवापूर टोल नाक्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठिय्या; टोल न भरता वाहनांची ये-जा
खेड शिवापूर : पुणे-सातारा महामार्गाची दुरावस्था व राजरोसपणे टोल वसुल करणारया महामार्ग प्राधिकरण व टोल प्रशासनाचा आज शनिवारी(दि. ३ ऑगस्ट) खेड शिवापूर टोल नाक्यावर टोल बंद आंदोलन करून जोरदार निषेध करण्यात आला. महामार्गाची दुरुस्ती झालीच पाहिजे, खेडशिवापूर टोल बंद झालाच पाहिजे, अशा घोषणा देत टोल नाक्यावरून जाणारी सर्व वाहने मोफत सोडून देत टोलनाका वसुली जोपर्यंत थांबवत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा आमदार संग्राम थोपटे व आमदार संजय जगतापांच्या नेतृत्वाखाली घेत काँग्रेस पक्षाच्या वतीने टोलनाक्यावर तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले होते. या प्रसंगी देविदास भन्साळी, श्रीरंग चव्हाण पाटील, संग्राम मोहोळ, शिवाजी जांभूळकर, शैलेश सोनवणे, गंगाराम मातेरे, नाना राऊत, विठ्ठल आवाळे, महेश टापरे, महेश धाडवे, धनंजय वाडकर, दिनकर धरपाळे, दिनकर सरपाले, शिवराज शेंडकर, नितीन दामगुडे, संदीप साठे, राहुल मते, प्रदीप अण्णा पोमण, अरुण भिलारे, सुनील निकाळजे, लहूनाना शेलार, रोहन बाठे, पोपटराव सुके, के.डी. सोनवणे, लहू अण्णा निवगणे, राहुल जाधव, महेश ढमढेरे यांच्यासह पुणे जिल्हा काँग्रेस व भोर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मांडला ठिय्या
खेड शिवापुर टोलनाक्यावर आंदोलन करण्यसाठी शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांची मोठी फौज जमा झाली होती. प्रथमता सातारा बाजूकडील टोलवर आंदोलन करून वाहने सर्व सोडून देण्यात आली त्यानंतर मुख्य टोलनाक्यावर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी रस्ता धड नाही तर टोल घेताच कशाला असा संतप्त सवाल करत जोपर्यंत लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत कोणताही कार्यकर्ता हटणार नसल्याचे आक्रमक भूमिका घेतली. पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी देखील यावेळी येथील स्थानिक जनतेच्या पाठीशी कायम राहणार असून टोल नाका बंदच केला पाहिजे अशी मागणी केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून पुणे-सातारा महामार्गाच्या दैनिक अवस्था बाबत संताप व्यक्त केला. दरम्यान, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी राजगड पोलिसांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
लेखी आश्वासन मिळताच आंदोलन स्थगित
आंदोलनामुळे कायदा-सुवव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो, यामुळे राष्ट्रीय प्राधिकनाने लेखी पत्र देत विविध मागण्या मान्य केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने या राष्ट्रीय महामार्गावर मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. यामुळे पुढील २४ तासांत खड्डे बुजविण्याचे काम सुरू करून येत्या ८ दिवसांमध्ये काम पुर्ण करण्यात येईल. सेवा रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण करण्यात येईल. टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांचे पुन्हा पोलीस पडताळणी करण्यात येईल. आदी मागण्या मान्य करीत सदर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात येईल, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सकाळी दहा वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी चार वाजता स्थगित करण्यात आले.