रिंग रोडच्या पश्चिम मार्गावरील ६४४ हेक्टर जमिनीचे संपादन
पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोड प्रकल्पाच्या पश्चिम मार्गावरील ३४ गावांपैकी ३१ गावांमधील ६४४ हेक्टर जमिनीच्या संपादनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी २ हजार ९७५ कोटींचा मोबदला दिला आहे.
भोर तालुक्यातील पाच गावे वगळून शिवरे गावाचा समावेश झाल्याने या गावातील मूल्यांकनाचे दर निश्चितीचे काम सुरू आहे. तोपर्यंत पूर्व मार्गावरील हवेली, मावळ, खेड आणि पुरंदर येथील जमिनीच्या भूसंपादनाबाबत जिल्हा प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.
पुलकुंडवार यांनी रिंगरोडच्या कामाची नुकतीच आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, रस्ते महामंडळाचे अपर जिल्हाधिकारी हणुमंत आरगुंडे, पूर्वेकडील भोर, हवेली, खेड आणि पुरंदर तालुक्यांचे प्रांत अधिकारी, तहसीलदार प्रामुख्याने बैठकीस उपस्थित होते.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने १७२ कि.मी. लांबी आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार स्ता प्रकल्प हाती घेतला आहे. दरम्यान, पूर्व मार्गावर मावळातील ११, खेड १२, हवेली १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश असून खेड तालुक्यातील भूसंपादनाबाबत बाधित गावातील शेतकऱ्यांना नोटीस पाठविल्या आहेत.
खेडमधील स्थानिकांना भूसंपादनाबाबत मुदतवाढीनुसार एक महिन्याचा कालावधी संपुष्टात येत असल्याने शेतकन्यांकडून स्वयंघोषणा पत्र घेण्यास सुरुवात केली आहे. उर्वरित मावळ तालुक्यातील ११ आणि हवेली तालुक्यातील १५ गावांबाबत तातडीने भूसंपादन करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश या वेळी देण्यात आले.