धक्कादायक! एखाद्या चित्रपटाला साजेल अशी पुणे-सातारा महामार्गावरील घटना; कारचालकाने तब्बल तीन किलोमीटर फरफटत नेली दुचाकी
किकवी : अगदी एखाद्या चित्रपटाला साजेल असाच प्रकार पुणे-सातारा महामार्गावर किकवी(ता. भोर) गावच्या हद्दीत आज गुरुवारी(दि. २२ ऑगस्ट) रोजी घडला. चक्क महामार्गावरील किकवी येथील हॉटेल प्रणव ते धांगवडी(ता. भोर) येथील हॉटेल सद्गुरू प्युअर व्हेज अशी ३ किलोमीटर अंतरापर्यंत कारचालकाने चालू महामार्गावरून रस्त्यावर प्रवास करणाऱ्या कोणाच्याही जीवाची पर्वा न करता दुचाकीला भरधाव फरपटत नेले. या अपघातामध्ये दुचाकी(एम.एच. १२ एम.सी. २६०८) वर स्वार असणारे पांडुरंग किसन मोरे आणि कोमल पांडुरंग मोरे(दोघेही रा. मोरवाडी ता. भोर) हे गंभीर जखमी झाले असून तेथे उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी व राजगड पोलिसांनी जखमींना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेमध्ये नेऊन नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे सातारा महामार्गावर पांडुरंग मोरे हे दुचाकीने प्रवास करत असताना पांढऱ्या रंगाची चारचाकी स्विफ्टने(एम.एच.१२ डब्लू ई ४१५३) भरधाव वेगात मागून येऊन दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यावेळी समोरील बोनेटला ही दुचाकी अडकली. यावेळी पांडुरंग मोरे आणि कोमल मोरे हे दोघेही खाली पडले. त्यानंतर निर्दयी कारचालकाने आपले वाहन न थांबवता त्या दुचाकीला तसेच फरफटत नेले. ही बाब रस्त्याने जाणाऱ्या अनेक नागरिकांच्या निदर्शनास आली. त्याचवेळी त्यांनी करचालकास रोखण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याने कुठेही लक्ष न देता त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने दुचाकीसहीत तीन किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. यावेळी प्रवासी व राजगड पोलिसांनी कारचा पाठलाग करून त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु करचालकाने कार 3 किलोमीटर नंतर महामार्गावर उभी करून पळ काढला. सदर घटनेबाबतचा अधिक तपास राजगड पोलीस करीत आहेत.