रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात निसर्गसौंदर्य खुलले; धबधबे, झरे, प्राचीन शिवमंदिर, पांडवकालीन लेण्या पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
भोर : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे निर्माण झालेले नयनरम्य धबधबे, खळखळून वाहणारे अनेक झरे तसेच निसर्गरम्य परीसर पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. रायरेश्वर पठाराच्या परिसरात निसर्गसौंदर्य धबधब्यांनी खुलले आहे. हा परिसर म्हणजे भोर तालुक्याला लाभलेले निसर्गाचे अद्भुत वरदानच आहे. या भागाचे सोंदर्य खुलते ते खऱ्या अर्थाने पावसाळ्यातच.
सहयाद्रीच्या डोंगर रांगानी व्यापलेला हा परिसर म्हणजे स्वराज्याची प्रेरणाभूमी म्हणून सर्वत्र ओळखली जाते. रायरेश्वराच्या एका बाजूला केंजळगड तर दुसऱ्या बाजुस धोम बलकवडी धरण असून परिसरातून विस्तृत पसरलेले सुंदर महाबळेश्वर पठार आहे. या भागात गेली काही वर्षापासून पावसाळ्यात आवर्जून भेट देण्याऱ्या निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी व पर्यटक लोकांची संख्या वाढत आहे. रायरेश्वर डोंगरागावरुन कोसळणारे अनेक धबधबे, ऐतिहासिक किल्ला, प्राचीन शिवमंदिर, पांडवकालीन पुरातन लेण्या, पाण्याचे झरे, दुर्मीळ फुले व वनस्पती असलेला परिसर तरुणांसहित ज्येष्ठांसाठी विलक्षण आकर्षण ठरत आहे.
रायरेश्वर येथील धबधबे व शंभू महादेवाचे पवित्र मंदिर परिसरात विकास होण्याची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. यामुळे नव्या रोजगार संधी निर्माण होऊन स्थानिकांना रोजगार मिळेल.
– समीर घोडेकर(उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, भोर)