किरण दगडे पाटील युवा मंचच्या वतीने नागरिकांना मोफत काशी दर्शन घडवण्याची चौथी वेळ; आत्ताच्या यात्रेत तीन हजार नागरिक सहभागी
भोर : नगरसेवक किरण दगडे पाटील युवा मंचच्या वतीने दरवर्षी मोफत काशी विश्वनाथ दर्शन यात्रेचे आयोजन केले जात असून यावर्षी देखील २५ हजर नागरिकांना दर्शनासाठी नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भोर विधानसभा मतदार संघातील भोर-राजगड-मुळशी तालुक्यातील नागरिकांना रेल्वेने काशीला घेऊन जाण्याची ही चौथी वेळ आहे. आत्ताच्या यात्रेत तीन हजार नागरिक सहभागी झाले असून यावेळी पुण्यातील खडकी रेल्वे स्टेशनवरून सर्व भाविक विशेष रेल्वेने काशीला रवाना झाले होते. या यात्रेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या वेळी भाविकांनी काशीयात्रा घडविणारा आधुनिक श्रावण बाळ असे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्याविषयी उद्गार काढले.
वाराणसी(काशी) मध्ये गेल्यानंतर सर्व नागरिकांना गंगा महाआरतीत सहभागी करून घेत काशी विश्वेश्वराचे दर्शन घडवण्यात आले. विशेष म्हणजे संपूर्ण प्रवासात भोर विधानसभा निवडणुक प्रमुख किरण दगडे पाटील नागरिकांच्या समवेत होते. या दरम्यान त्यांनी प्रत्येक भाविकाची आपुलकीने काळजी घेतली. या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे समस्त नागरिक यात्रेसाठी येण्यासाठी कायम इच्छुक असल्याचे पाहायला मिळते. या संपूर्ण यात्रेत नागरिकांना संपूर्ण ५ दिवस सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, सायंकाळी चहा नाष्टा, संध्याकाळी जेवण तसेच वाराणसी येथे पोहचल्यानंतर बनारस स्टेशनपासून निवासस्थानापर्यंत वाहतूक व्यवस्था, निवासाची सोय, जेवण, दर्शन, आरती अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन या यात्रेतील यात्रकरू पुन्हा माघारी फिरले असून काही दिवसांत तीनही तालुक्यांत सामूहिक गंगापूजन होणार असल्याचे किरण दगडे पाटील यांनी सांगितले.