ऐन गणेशोत्सवात एसटीची चाकं थांबली; राज्यातील एसटीच्या ३५ आगारतील वाहतूक ठप्प
भोर : ऐन गणेशोत्सव, गौरी आणि सणांच्या काळात राज्य परिवहन कर्मचारी संघटनांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. एसटीची चाकं थांबल्यामुळे गणपती उत्सवासाठी गावी जाणारे भाविक चिंतेत आहेत.
सातवा वेतन अयोगासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवार सकाळपासून आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे राज्यातील एसटीचे ३५ आगार पुर्णपणे बंद आहेत. यामुळे एसटीच्या वाहतुकीला राज्यात फटका बसल्याने प्रवाशाचे हाल होत आहेत.
एस.टी. मधील ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत २५१ आगारापैकी ३५ आगार पुर्णतः बंद आहेत. बाकीचे आगार अंशतः अथवा पुर्णतः सुरू आहेत. मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे. तथापि, ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पुर्णतः बंद आहेत. विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे. तेथे बंदचा इतका प्रभाव दिसून येत नाही. तथापि, मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत. खानदेशात नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव ,पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी एसटीने सुरु असलेल्या जादा वाहतुकीला फटका बसला आहे.