सारोळ्यातील शाळेत शिक्षणाधिकारी व गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या हस्ते स्पॅनिश पुस्तकाचे प्रकाशन
सारोळा : शिक्षक दिनाचे औचित्य साधत पुणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे तसेच भोर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा(ता. भोर) येथे आज गुरुवारी(दि. ५ सप्टेंबर) खास पुस्तक प्रकाशनासाठी भेट दिली. यावेळी शिक्षिका वंदना परशुराम कोरडे यांनी जास्तीत जास्त मुलांपर्यंत स्पॅनिश भाषा पोहोचावी यासाठी स्वखर्चातून तयार केलेल्या “चला स्पॅनिश शिकूया” या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तक गोरगरीब व गरजू मुलांना मोफत देणार असल्याचे शिक्षिका कोरडे यांनी यावेळी सांगितले.
यादरम्यान शिक्षिका कोरडे यांनी सुरू केलेल्या “माय रियल हिरोज” या उपक्रमातही त्यांनी सहभाग घेतला. यावेळी मुलांनी विचारलेल्या प्रश्नांचीही उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली. क्यूआर कोड तसेच रोबोटिक्स आणि स्पॅनिशचे पुस्तक यांसारखे उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी शालेय अभ्यासाचाही आढावा घेतला. यावेळी मुलांना स्पॅनिश शिकवताना स्वतःही स्पॅनिश शिकणाऱ्या पालक ललिता घोलप, प्रियंका बोरगे यांच्याशीही त्यांनी स्पॅनिश या विषयाबाबत संवाद साधला. तसेच उपस्थित सर्व शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विजयकुमार थोपटे, संदीप सावंत, छाया हिंगे, कांचन धोपटे, जया जाधव, जयश्री शिर्के, अर्चना वानखडे आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते.