भोर तालुक्यातील ७ जिल्हा परिषदेच्या शाळा धोकादायक स्थितीत; पुणे जिल्ह्यातील पावणे दोनशे शाळा आल्या दुरुस्तीला
पुणे : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या तसेच शाळांमधील प्रवेशोत्सव मोठ्या थाटात झाला. पण, जिल्हा परिषदेच्या ३ हजार ६२१ पैकी १७६ शाळांची दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राजकीय मंडळी तसेच प्रशासनही व्यस्त होते. आता त्यातून बाहेर पडल्यानंतर या शाळांच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला वेळ मिळेल आणि पुरेसा निधी मिळून काम पूर्ण होईल, ही पालकांची अपेक्षा आहे.
सध्या पावसाळा सुरू असून, त्यानुषंगाने धोकादायक शाळांतील वर्ग सुरक्षित ठिकाणी भरविण्याचे नियोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे. १७६ शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी शाळांच्या जिल्हा नियोजन समिती तसेच जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली केल्या आहेत. दरम्यान, जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषदेकडून किती निधी उपलब्ध होतो, हे पाहून काही कंपन्यांच्या सीएसआर फंडाचीही मदत घेण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा जुन्या इमारतींमध्ये सुरू आहेत. त्यातील काही शाळांची अवस्था दयनीय झाली आहे. भिंतींना तडे, कौले फुटलेली, पडझड होऊन इमारती धोकादायक झाल्या आहेत. धोकादायक ठरलेल्या शाळांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याकारणाने मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्रत्येक शाळांकडून माहिती भरून घेतली. त्यात शाळांची दुरुस्ती तसेच धोकादायक वर्गखोल्यांची स्थिती जाणून घेतली असता जिल्ह्यातील ३ हजार ६२१ पैकी १७६ शाळांची दुरुस्ती करण्याची गरज आहे.
वर्गखोल्या खिळखिळ्या…
जिल्हा परिषदेच्या शाळेतील ८० वर्गखोल्या खिळखिळ्या झाल्या आहेत. जुन्या आणि धोकादायक मोडकळीस आलेल्या ८० वर्गखोल्या पाडून त्याजागी नव्याने वर्ग बांधण्याच्या कामाचादेखील पाठपुरावा सुरू असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांमध्ये आंबेगाव ७, बारामती ९, भोर ७, दौंड १०, हवेली ५, इंदापूर १०, जुन्नर ६, खेड ५, मावळ ६, मुळशी, पुरंदर आणि शिरूर तालुक्यातील प्रत्येकी पाच वर्गखोल्यांचा समावेश आहे.