वडगाव मावळमध्ये ३५ हजारांची लाच स्वीकारताना दोन पोलीस कर्मचारी “एसीबी”च्या जाळ्यात
पुणे : मारहाणीच्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करून ३५ हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एक पोलीस अधिकारी व पोलीस शिपायाला रंगेहाथ अटक केली. ही कारवाई बुधवारी(दि. ४ सप्टेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीत करण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील तुळशीदास मगर(वय ५१ वर्ष) व पोलीस शिपाई सागर कैलास गाडेकर(वय ३४ वर्ष) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. तक्रारदार यांच्या मारामारीच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सुनील मगर व पोलीस शिपाई सागर गाडेकर यांच्याकडे आहे. या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी मगर व गाडेकर यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोड करून ३५ हजार रुपये लाचेची रक्कम ठरली. याबाबत पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात २९ ऑगस्टला तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार आरोपींना पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्यावर वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक शीतल जानवे, पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तसेच किरण शेलार, कैलास महामुनकर, पूनम पवार, पांडुरंग माळी आदींच्या पथकाने ही केली.