खेड शिवापूर येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
खेड शिवापूर : पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर(ता. हवेली) येथील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशोक श्रीपती शिंदे(वय ५५ वर्ष) असे या व्यक्तीचे नाव आहे. अविनाश दशरथ शिंदे(वय ४३ वर्ष, रा. खेडशिवापूर, ता. हवेली) यांनी याबाबत खबर दिली असून याबाबत राजगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर येथील रहिवाशी शेतकरी अशोक शिंदे हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. शनिवारी(दि. २८ सप्टेंबर) शेतात काम करत असताना दुपारी ३ वाजता त्यांच्या उजव्या पायाला विषारी सर्पाने दंश केला. त्यावेळी खबर देणार अविनाश शिंदे यांनी अशोक शिंदे यांना मोटारसायकल वरून आणत खेडशिवापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अखेर आज रविवारी पहाटे त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या या अकस्मात मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पाश्चात आई, पत्नी, आणि दोन मुले असा परिवार असून त्यांच्या पत्नी छाया शिंदे या ग्रामपंचायत सदस्य आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलिस अंमलदार अजीज मेस्त्री करीत आहेत.