भोर – महुडे एसटी बसचा अपघात; दहा प्रवासी जखमी
भोर : भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील महूडे खोऱ्यात महुडेवरून भोरला येणाऱ्या एसटी बसचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घटना घडली असून या अपघातात १० प्रवासी जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, महूडे(ता.भोर) खोऱ्यातून नेहमीप्रमाणे भोरकडे एसटी बस येत असतात. यादरम्यान आज सोमवारी(दि.३० सप्टेंबर) सकाळी महुडे गावाजवळील मोठ्या वळणावर साईड पट्टी खचल्याने एसटी(एम.एच. ०६ एस. ८२८९) रोडवरून खाली उतरली असल्याची माहिती प्रथमदर्शिंनी दिली आहे. परंतु हा अपघात एसटी मधील तांत्रिक बिघाडामुळे झाला ? की रोडची साईड पट्टी खचल्यामुळे ? याचे ठोस कारण अजून समजलेले नाही. अचानक हा प्रसंग घडल्यामुळे प्रवाशांनी भरलेल्या या एसटी मधील दहा प्रवासी हे जखमी झाले असून जखमींना भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.