हरिश्चंद्रीत प्रथमच पार पडले वार्षिक स्नेहसंमेलन; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
कापूरहोळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरिश्चंद्री(ता.भोर) येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले. या कार्यक्रमासाठी शाळा परिसर विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी खचाखच भरून गेला होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शासनाच्या तोंडी आदेशावर कार्यरत असणारे आदर्श शिक्षक विठ्ठल पवार यांनी केले होते.
या समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन,छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजनाने झाली. त्यानंतर अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य, नाटक, वादन आणि गायन सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा काळ लक्षात घेता त्यांच्यातील विविध क्षमतांना वाव देण्याच्या हेतूने विविध उपक्रम शाळेत राबवले जातात. मुलांच्या अंगी असलेल्या सुप्तकलागुणांना, प्रतिभाशक्तीला वाव देण्यासाठी आणि मुक्तपणे भावना व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी अशा रीतीने पहिलेच वार्षिक स्नेहसंमेलन नियोजनबद्ध व प्रभावीपणे पार पडले. या स्नेहसंमेलनात भारतीय संस्कृतीला अनुसरून पोवाडा, भजन, एकपात्री प्रयोग, भारुड, नाटिका, जुन्या-नवीन हिंदी गाण्यांवर आधारित रेकॉर्ड डान्स, रामायणावर आधारित गीत, राजा शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास यावर आधारित असणारी गीते यासारख्या बहारदार गीतांचा समावेश करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या मांदियाळीत मुलांनी भरभरून आनंद लुटला. अतिशय आनंदी वातावरणात स्नेहसंमेलन संपन्न झाले. पालकांनी ,ग्रामस्थांनी शाळेच्या कार्यावर आणि शिक्षकांवरील विश्वास व्यक्त करणारी भाषणे केली. या प्रसंगी ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, जय हनुमान तरुण मंडळ, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व सदस्य , महिला बचत गट, विविध विकास सेवा सोसायटीचे आजी-माजी चेअरमन संचालक गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ग्रामस्थ,महिला, पालक, विद्यार्थी तरुण, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी शाळेच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.