भोर तालुक्यातील ऐतिहासिक अशा रायरेश्वर किल्ल्यावर चक्क ४ हजार ६९४ फुट उंचीवर ट्रॅक्टर नेला…
भोर: छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याची ऐतिहासिक शपथ ज्या रायरेश्वर किल्यावर घेतली.तिथे एक अजब गोष्ट तेथील स्थानिक शेतकरी अशोक जंगम आणि रवींद्र जंगम यांनी करून दाखवली आहे. ज्या ठिकाणी चालणेही कठीण असते अशा ठिकाणी त्यांनी शेतीची मशागत सोप्पी होण्यासाठी चक्क ट्रॅक्टर च ४ हजार ६९४ फूट उंच किल्ल्यावर नेण्याचा विक्रम केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांनी त्यांच्या काळात किल्ल्यावरील मंदिरात पूजेसाठी काही जंगम कुटुंब आणले होते.ते लोक तिथेच स्थायिक झाले.आज जवळ जवळ किल्ल्यावर ४० ते ४५ जंगम कुटुंब राहतात.यांचे उदरनिर्वाहाचे साधन मंदिरातील पूजा आणि शेती हेच आहे.रायरेश्वर किल्ल्यावर गहू उगवला जातो .आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा गहू फक्त किल्ल्यावर येणाऱ्या दवबिंदू वर उगवतो. तेथील जंगम कुटुंब हे रायरेश्वर किल्ल्यावर १६ कि.मी. च्या विस्तीर्ण पठारावर शेती करतात.किल्ल्यावरील शेती मशागत सोप्पी व्हावी म्हणून तेथील जंगम कुटुंबांमधील अशोक जंगम आणि रवींद्र जंगम यांनी हा निर्णय घेतला.शुक्रवार (दि.२०) रोजी त्यांनी ट्रॅक्टर कंपनीतील कामगार व स्थानिक लोकांच्या मदतीने ट्रॅक्टर वर नेला.ट्रॅक्टर वरती नेण्यासाठी ८ ते १० लोक होते. हा ट्रॅक्टर वरती नेल्यानंतर चालू करण्यात आला. यामुळे शेतीची कामे सोपी होतील असे जंगम कुटुंबांनी या वेळी सांगितले.भोर तालुक्यात या गोष्टीची सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहे.