स्वर्गीय दादा कोंडके ट्रस्टच्या वतीने हातवे येथे मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
नसरापूर : स्वर्गीय दादा कोंडके ट्रस्टच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे विविध समाजोपयोगी विधायक कार्यक्रम राबविण्यात येत असतात. यादरम्यान ट्रस्टच्या वतीने महिला स्वसंरक्षण अभियानांतर्गत विद्यार्थिनी तायक्वांदो व सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर शुक्रवारी(दि. ४ ऑक्टोबर) हातवे(ता.भोर) येथे संपन्न झाले. शिबिरात मुलींना प्रशिक्षण देऊन स्वसंरक्षण तंत्राद्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच मूलभूत तंत्रांचे प्रात्यक्षिक विद्यार्थिनींना दाखवण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींसमोर तायक्वांदोचा अर्थ, उद्देश आणि पायऱ्या मांडल्या गेल्या तसेच पहिले धडे प्रत्यक्षपणे शिकवण्यात आले.
समाजातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी स्वसंरक्षण फार गरजेचे आहे. प्रत्येक स्त्री व मुलींना स्वसंरक्षणासाठी सक्षम करणे, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वर्गीय दादा कोंडके ट्रस्टने हा उपक्रम राबविला असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष दशरथ जाधव यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष निलेश पांगारकर, खजिनदार राहुल माने, सचिव कुणाल मालुसरे, कार्याध्यक्ष ओमकार तांदळे, सदस्य चंद्रकांत शेलार, केतन देवकर, सुदर्शन काटकर, राजेंद्र पवार तसेच युनिक अकॅडमीच्या प्रशिक्षिका नीलम निकम व संस्थापक जितेंद्र भगत आणि काशिनाथराव खुटवड विद्यालयातील मुख्याध्यापिका छाया खुटवड व सर्व शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.