ताम्हिणी घाटात हॉटेल वर दरड कोसळून एक जण ठार; घाट वाहतुकीसाठी बंद
मुळशी : मुळशीतील ताम्हिणी घाट, मुळशी धरण परिसर, लवासा, मुठा खोरे, कोळवण खोरे, रिहे खोरे, भादस खोरे सर्वच भागात पावसाचा रात्रभर जोर सुरू आहे. आदरवाडी (ताम्हिणी)येथील पिकनिक पॉइंट हॉटेल वर दरड कोसळली असून त्यामध्ये दोन इसम हॉटेल खाली दबले होते त्यांना पोलिसांनी व तेथील लोकांनी बाहेर काढून पुणे येथे हॉस्पिटल मध्ये पाठवले असून त्यामधील शिवाजी मोतीराम बहिरट(वय ३० वर्ष) याचा मृत्यू झाला आहे.
आदरवाडी व माणगाव जिल्हा रायगड हद्दीत सुद्धा दरड कोसळली त्यामुळे कोलाड पुणे हायवे पूर्णपणे बंद झालेला आहे. तसेच नांदिवली येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाळ राडारोडा आला असून गाडी चालवणे कठीण झाले आहे. मुळशी मावळ प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसिलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी आदरवाडी ताम्हिणी येथे पहाटेच घटनास्थळी भेट दिली नंतर लवासा दासवे या ठिकाणी तत्काळ पाहणी करिता गेले आहेत. तर घटना स्थळी आपत्ती व्यवस्थापन टीम प्रमोद बलकवडे उपस्थित झालेले आहेत.