हिंदू देवी- देवतांची चित्रे असणाऱ्या फटाक्यांची विक्री नको; सकल हिंदू समाज भोरच्या वतीने निवेदन
भोर : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्याआधी फटाक्यांची विक्री तसेच निर्मिती प्रक्रियेला सुरुवात होते. मात्र दरवर्षी दिवाळीच्या सणात मिळणाऱ्या फटाक्यांवर हिंदू देवी-देवतांची चित्रे, नावे असतात. त्यामुळे हिंदू देवतांची बदनामी होत असते. लक्ष्मी बॉम्ब यासारखी देवीदेवतांची नावे व छायाचित्र वेष्टनावर छापली जातात. ग्राहकही मोठ्या संख्येने या प्रकाराकडे आकर्षित होतात. मात्र देवतांच्या प्रतिमा असलेले फटाके फोडताना या प्रतिमांचे नकळतपणे अवमूल्यन होत असल्याकडे सर्वांचेच दुर्लेक्ष होते.
यामुळेच हिंदु देवतांची चित्रे असणार्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी यावी आणि असे फटाके विक्रेत्यांवर कारवाई करावी, तसेच एम्.आय.एम्.चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काढलेल्या तिरंगा रॅलीच्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सकल हिंदु समाज, भोर यांच्या वतीने भोर येथील अपर तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, तसेच भोर पोलीस ठाण्यात देण्यात आले. यावेळी हिंदुत्वनिष्ठ सोमनाथ ढवळे, सुनील खळदकर, राहुल शिंदे, अक्षय पवार, गणेश बांदल, प्रदीप बांदल, अमित शहा, रोहित देशमाने, प्रमोद पाटील, वैभव आवाळे, संजय कुलकर्णी, अमर बुदगुडे, यश पवार, हिंदु जनजागृती समितीचे श्रीकांत बोराटे आणि अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.