राजगड तालुक्यातील वडगाव झांजेत सुनेत्रा पवारांच्या झालेल्या अनोख्या स्वागताची सगळीकडे चर्चा
राजगड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भोर आणि राजगड तालुक्यात सर्व राजकीय पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे राजगड तालुक्यातील वडगाव झांजेमधील गावकऱ्यांनी केलेल्या स्वागताची सगळीकडे चर्चा पहायला मिळाली. गावच्या वेशीपासून सुमारे अर्धा किलोमीटर आत गावापर्यंत रांगोळ्यांच्या अंथरलेलया पायघड्या, युवकांचे ढोल पथक आणि प्रत्येक घरातील माता भगिनींनी केलेले औक्षण, गावातील तमाम ज्येष्ठ मंडळीनी तरूणांसह धरलेला लेझिमचा डाव अशा जल्लोष पूर्ण वातावरणात संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला.
या भारावलेल्या वातावरणासहित ही मिरवणूक भैरवनाथ मंदिरासमोर पोहोचली असता, यामध्ये प्रचाराला उपस्थित असणारे पुणे जिल्हा कात्रज दुध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किरण राऊत, जिल्हा सरचिटणीस अर्जून भिलारे, वेल्हे खुर्दचे सरपंच प्रकाश जेधे यांच्यासह सर्व उपस्थितांनी लेझीमच्या डावावर ताल धरला. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मोनिका हरगुडे आणि मोनिका बांदल यांनीही या जल्लोषात सहभागी होऊन फुगडी घातली. याच माहोलात घड्याळाचा गजर करून महायुतीच्या विजयाचा निर्धार करण्यात आला.
भोर राजगड मुळशी विधानसभा मतदार संघातील राजगड, तोरणा या गडकोटांच्या कुशीत राजगड तालुक्यात पार पडलेला संपर्क दौरा म्हणजे महायुतीच्या विजयाची मिळालेली ग्वाही अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली. तर संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची प्रचिती आजच्या राजगड तालुका दौऱ्यात आली असल्याचे सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले. जनसागराच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जनसंपर्कासोबत राज्य आणि केंद्र शासनाचा माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व शक्तीनिशी कटिबद्ध राहीन, हा शब्द देखील यावेळी सुनेत्रा पवार यांनी गावकऱ्यांना दिला.
यावेळी राजगड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष दामगुडे, प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे, अण्णासाहेब देशमाने, संदीप खुटवड, विकास नलावडे, निर्मला जागडे, कीर्ती देशमुख, शैला दारवटकर, संगीता जेधे स्थानिक ग्रामस्थ सत्यवान दामगुडे ,दिनकर झांजे, किसन झांजे, पांडुरंग झांजे, शंकरराव दामगुडे, बापूसाहेब आलगुडे, तानाजी झांजे, किरण पानसरे, दशरथ झांजे, माऊली झांजे, काशिनाथ झांजे, अलका झांजे, हर्षदा झांजे, रुपाली झांजे, ज्योती दामगुडे, तानाजी झांजे, विठ्ठल झांजे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.