भोर विधानसभेची निवडणूक चौरंगी होणार?, कुलदीप कोंडे, किरण दगडे पाटील अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम
भोर : भोर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी दुरंगी लढत होण्याची शक्यता भोर-राजगड-मुळशी तालुक्यातील नागरिकांनी वर्तवली होती. त्याचे कारणही तसेच होते. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तसेच काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधात महायुतीच्या तिनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वज्रमूठ करत एकच उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामध्ये शिवसेने कडून कुलदीप कोंडे, भारतीय जनता पक्षाच्या वतीने किरण दगडे पाटील, तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून रणजित शिवतरे इच्छुक होते.
महायुतीची वज्रमूठ” ही अखेर ठरली “वज्रझूठ
परंतु सोमवारी(दि. २८ ऑक्टोबर) रोजी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भोर व खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. आणि महायुतीने एकच उमेदवार देण्यासाठी केलेली “वज्रमूठ” ही अखेर “वज्रझूठ” ठरली. भोर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महायुतीतील तीनही प्रमुख नेत्यांनी बंडखोरी करून शक्ती प्रदर्शन करत आपले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांचे बंड अखेर थंड
यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले रणजीत शिवतरे यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाल्यामुळे निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या आशा मावळल्या आहेत. तसेच बुधवारी(दि. ३० ऑक्टोबर) रोजी भोर व राजगड(वेल्हे) तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले बंड थंड करत तातडीने बैठक बोलवली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले उमेदवार शंकर मांडेकर यांना विजयी करण्याचा एक मुखाने निर्णय घेण्यात आला.
कुलदीप कोंडे व किरण दगडे पाटील यांनी केले गावभेट दौरे सुरू
परंतु कुलदीप कोंडे आणि किरण दगडे पाटील हे भोर विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असून या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी गाव भेट दौरे व अपक्ष प्रचार सुरू केले आहेत. “भोर विधानसभेतील महायुतीच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याला विचारात न घेता पक्षश्रेष्ठींनी उमेदवार जाहीर केल्यामुळे” हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे कुलदीप कोंडे यांनी सांगितले. तर किरण दगडे पाटील म्हणाले की, “भोर-राजगड(वेल्हे)- मुळशीत मी अनेक विधायक कामे केली आहेत. त्यामुळे ही निवडणूक जनतेच्या जीवावर लढणार असल्याचे” त्यांनी सांगितले. यामुळे भोर विधानसभेत दुरंगी होणारी लढत चौरंगी होणार असल्याची चर्चा भोर राजगड मुळशीतील जनतेच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. त्यामुळे भोर विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून जनता कोणाच्या पारड्यात आपले मताधिक्य टाकणार? याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.