सहकार आणि साखर क्षेत्राशी संबंधित पुणे जिल्ह्यातील पाच पराभूत राजकीय नेत्यांपुढे आव्हान

पुणे : सहकार क्षेत्रावर पकड असलेल्या पुणे जिल्ह्यातील पाच राजकीय नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसला आहे. सहकार आणि साखर क्षेत्राशी संबंधित असलेल्या या पाच जणांना निवडणुकीत पराभूत व्हावे लागले असल्याने सहकारातील त्यांच्या वर्चस्वालाही धोका निर्माण झाल्याचे मानले जाते.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला, तसेच सहकार आणि साखर क्षेत्रातील दिग्गजांचा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील अनेक आमदारांनी सहकाराचा ताबा घेऊन राजकारणावरील पकड मजबूत केली. यंदा मात्र, शिरूर, जुन्नर, इंदापूर, भोर आणि मावळ या मतदारसंघांतील साखरसम्राट आमदारांना धक्का बसला आहे, तर खेड, पुरंदरमधील जिल्हा बँका ताब्यात असलेल्या आमदारांनाही पराभूत व्हावे लागल्याने सहकारातील त्यांच्या वर्चस्वाला हादरा बसल्याचे मानले जात आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिरूरचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे माजी आमदार अशोक पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याशी संबंधित आहेत. त्यांना शिवसेना (ठाकरे) पक्षातून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात गेलेले माऊली कटके यांनी पराभूत केले. जुन्नरमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजी आमदार अतुल बेनके आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर यांना बंडखोर उमेदवार शरद सोनावणे यांनी पराभवाची धूळ चारली.

Advertisement

इंदापूरचे माजी मंत्री, राष्ट्रीय सहकार साखर संघाचे अध्यक्ष आणि कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचीही पराभवामुळे सहकारावरील पकड ढिली होण्याची शक्यता आहे. इंदापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’मध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांना राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पराभूत केले. भोरमधील राजगड सहकारी साखर कारखान्याशी संबंधित असलेले आणि भोर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळविणारे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. मावळ मतदारसंघात बंडखोरी करणारे बापू भेगडे हे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष असून, त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

याशिवाय जिल्हा बँकेचे संचालक असलेले पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप आणि खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील हेही या निवडणुकीत पराभूत झाले. राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील हे आंबेगाव आणि दौंडचे भाजपचे आमदार, भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल हे मात्र त्याला अपवाद ठरले आहेत. दुसरीकडे मात्र बाबाजी काळे, शंकर मांडेकर, सुनील शेळके, विजय शिवतारे आणि शरद सोनवणे यांनी विजय मिळविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page