कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ! पुणे जिल्ह्यातील इच्छुक मुंबईत
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : राज्यात नव्याने आरूढ झालेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर कोणाकोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याची उत्सुकता लागली आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे आमदार मुंबईत तळ ठोकून आहेत.
मंत्रिपदासाठी प्रामुख्याने भाजपकडून चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ आणि राहुल कुल यांचे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तात्रेय भरणे आणि शिंदे गटाकडून विजय शिवतारे यांची नावे चर्चेत आहेत. पुणे जिल्ह्याच्या वाट्याला नक्की किती मंत्रिपदे मिळणार आणि ती कोणत्या पक्षाच्या आमदारांना मिळणार, याचा अंदाज घेऊन इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी होण्याचे संकेत असून, त्यादृष्टीने राजकीय नेते आणि आमदारांची मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रादेशिक समतोल, आमदारांची संख्या तसेच राजकीय प्राबल्य लक्षात घेऊन मंत्रिपदाची नावे ठरवली जाणार आहेत; मात्र त्यापेक्षाही दिल्लीतील राजकीय वजन वापरून भाजपमध्ये मंत्रिपद मिळविण्यासाठी काहीजण प्रयत्न करीत आहेत, असे असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील तोच निर्णय होणार, असा मतप्रवाह भाजपामध्ये असल्याने पुण्यातील इच्छुकांनी दिल्लीपेक्षा मुंबईतील संपर्कावर भर दिला आहे.
अजित पवार गटाकडून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच एका आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळू शकते. जिल्ह्यात त्यांच्या गटाचे आठ आमदार आहेत. एखाद्या नव्या आमदाराला संधी देण्याचा प्रस्ताव पक्षापुढे आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांचे नाव मागे पडले आहे.
पक्षीय समतोल की, राजकीय वजन
पुण्यात विधानसभेचे २१ आमदार आहेत, यामध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण जिल्हा असे तीन विभाग असून विभागातील समतोल राखता यावा यासाठी मंत्रिपदाची विभागणी करावी, असादेखील प्रस्ताव आहे. परंतु महायुतीचे तीन पक्ष आणि त्यांच्या आमदारांची संख्या विचारात घेता पक्षीय समतोल ठेवून मंत्र्यांची निवड करणे याला प्राधान्य दिले असल्याचे सांगण्यात येते.