शेतीचा वाद; भाऊच ठरला वैरी! अहिऱ्यात चुलत भावाचा खून
खंडाळा : शेताच्या बांधावरुन झालेल्या वादाचा राग मनात धरून अहिरे (ता.खंडाळा) येथे ज्ञानेश्वर विलास धायगुडे याने त्याचा चुलत भाऊ असलेल्या मोहन सुरेश धायगुडे याच्या डोक्यात दगड घालून खून केला.
याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अहिरे (ता.खंडाळा) येथील शेरी नावाच्या शिवारात मोहन धायगुडे व ज्ञानेश्वर धायगुडे यांची शेती असून, या दोघांमध्ये शेताच्या बांधावरुन नेहमी वाद होत असे. शनिवारी (दि.२३) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर धायगुडे व मोहन धायगुडे यांच्यात वाद झाला होता. यावेळी ज्ञानेश्वर याने मोहन यास शिवीगाळ करून ‘तुला जीवंत ठेवत नसतो’ अशी धमकी दिली होती.
संबंधित घटनेची कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती. यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर धायगुडे व मोहन यांच्यात गावाच्या पारावर भांडण झाले आणि ज्ञानेश्वर याने मोहन यास मारहाण करत डोक्यात दगड घालून खून केला. यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर याला ताब्यात घेतले. या घटनेची फिर्याद वैशाली मोहन धायगुडे यांनी दिली असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत.