भोर-वेल्हा-मुळशीतील घराणेशाही हटवा; मुळशीत लागले आमदार संग्राम थोपटेंच्या विरोधात बॅनर
मुळशी : मुळशी तालुक्यात भोर-राजगड-मुळशीचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या कामाचा लेखाजोखा विचारणाऱ्या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. या बॅनरच्या माध्यमातून “मतदार संघातील घराणेशाही हटवा”, असा उल्लेख करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर-राजगड-मुळशी या मतदार संघात गेली १५ वर्ष काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे नेतृत्व करत आहेत. त्या अगोदर त्यांचे वडील तसेच माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी या मतदार संघातून नेतृत्व केलं.
मात्र, मुळशी तालुक्यात म्हणावं असा विकास झालेला नसल्यामुळे या भागात येत्या निवडणुकीच्या तोंडावर आमदार थोपटे यांच्या विरोधात हे बॅनर लावण्यात आले असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. मुळशीत लवळे फाटा, घोटावडे, घोटावडे फाटा, भरे, भुकुम, भुगाव या गावात हे बॅनर लावण्यात आले आहेत.
या बॅनरच्या माध्यमातून ट्राफिक आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधी मिटणार? निवडणूकीच्या वेळी तोंड दाखवणाऱ्यांना तोंडावर पाडा, मुळशी तालुक्यासाठी आमदारांनी काय केलं? गेली १५ वर्ष मुळशी तालुक्याचा विकास का झाला नाही? असा जाब विचारण्यात आलाय.