मुळशी तालुक्यातील माजी सरपंचांच्या घरातून सात लाखांचे दागिने लंपास
मुळशी (प्रतिनिधी) : पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पौड गावाचे माजी सरपंच विनायक गुजर यांच्या घरात चाेरी झाली असून या घटनेत सात लाख बावीस हजारांचा ऐवज चोरांनी लंपास केला असल्याचे समजत आहे. यामध्ये सोने आणि चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
पाेलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार पौडच्या गजबजलेल्या जुन्या बाजारपेठेत गुजर यांचे घर आहे. या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. आतील दोन दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील कपाटाची कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. मागील दरवाज्याने चोर पळून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेत सोन्याच्या अंगठ्या, साेन्याचे गोप, साखळी, ब्रेसलेट, पोत, बदामाचे पान, चांदीचे ताम्हण, बांगड्या, गणपतीचा मुकुट, पैंजण, मनगटे, कानातील मोत्यांची व चांदीच्या कुड्या असे साडेअकरा तोळे सोने व ४६ तोळे चांदी चाेरीस गेल्याची नाेंद करण्यात आली आहे. पौड पोलिस चोरांचा शोध घेत आहेत.