३० वर्षापूर्वी सुरू केलेली भोर ते स्वारगेट विनाथांबा एसटी सेवा बंद

भोर : बस स्थानकातून दररोज प्रवाशांच्या सोईसाठी ३० वर्षापूर्वी सुरू केलेली भोर ते स्वारगेट विनाथांबा एसटी बससेवा प्रशासनाने अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे बुधवारपासून (दि.१ जानेवारी) बंद केली आहे.

त्यामुळे नौकरी, व्यवसाय व इतर कारणाने पुण्याला ये-जा करणारे नोकरदार आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. बसचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रवाशांमध्ये अगोदरच तीव्र संताप असताना विनाथांबा बससेवा बंद केल्याने प्रवाशांमध्ये अधिक नाराजी दिसून येत आहे.

सध्या दररोज विविध कारणांनी सरासरी ४० टक्के बसफेऱ्या रद्द होत आहेत. विनाथांबा स्वारगेटला जाणारी बस भरून जाते. मात्र येताना प्रवासी संख्या कमी असल्याने दररोज मोठा तोटा होतो. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.

Advertisement

विनाथांबा बस बंद केल्या तरी दररोज सर्व थांबा बसेसच्या २२ फेऱ्यांचे नियोजन काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्थानकप्रमुख प्रदीप इंगवले यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी दुपारपर्यंत चार फेऱ्या रद्द झाल्या होत्या. मुदतबाह्य झालेल्या आणि वारंवार बंद पडणाऱ्या जेमतेम ३६ बस भोरच्या आगारात आहेत. कर्मचारी संख्याही अपुरी आहे.

त्यातून पुणे, वाशी, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक व ग्रामीण अशा १७२ फेऱ्यांचे दररोज नियोजन असते. त्यापैकी वाशी, सोलापूर, संभाजीनगर या चार मार्गावर बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. उर्वरित सर्व मार्गावर कमी अधिक प्रमाणात तोटा होत असल्याचे सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page