चिखलगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीसाठी ७५ लक्ष निधी मंजूर – संग्राम थोपटे
भोर : भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील चिखलगाव येथे नूतन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यात आले असून इमारत बांधकाम करण्यासाठी रक्कम रू. ७५ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. या भागातील रुग्णांना उत्कृष्ट आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
चिखलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या मागणीनुसार थोपटे यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यासाठी आरोग्य विभाग व संबंधित अधिकारी तसेच आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून आरोग्य उपकेंद्र मंजूर केले व त्यासाठी आता तब्बल ७५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामुळे स्थानिक ग्रामस्थांना उद्भवणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, महत्त्वपूर्ण आकडेवारी गोळा करणे, रेफरल व प्रयोगशाळेच्या सेवा पुरविणे तर जीवघेण्या आजारांपासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी उपकेंद्राचा रुग्णांना लाभ होणार आहे.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, माजी आमदार थोपटे यांनी विशेष लक्ष घालून आरोग्य सेवा उपलब्ध केल्याबद्दल एकनाथ गायकवाड, आनंदराव धोंडे-पाटील भेट घेऊन आभार व्यक्त केले.