तासगाव खून प्रकरणातील पुण्यातील सराईत गुन्हेगारास खेड शिवापूर येथून अटक
खेड शिवापूर : तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्ववैमनस्यातून रोहित संजय फाळके यांचा खुन केल्या प्रकरणी पुण्यातील गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने २४ तासाच्या आत पकडले.
विशाल सज्जन फाळके (वय ३२, रा. हनुमाननगर, आंबेगाव खुर्द) असे त्याचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून सहा जणांनी ओंकार ऊर्फ रोहित संजय फाळके (वय २४ वर्ष) यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांचा गुरुवारी सायंकाळी सव्वासहा वाजता खून केला होता. रोहित फाळके व विशाल फाळके यांच्या कुटुंबीयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणावरुन वाद होत होते. त्यातून रोहित फाळके यांचा खुन करण्यात आला.
ही घटना घडल्यानंतर शुक्रवारपासून सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक पुणे पोलिसांच्या संपर्कात होते. विशाल फाळके याची माहिती काढणे सुरु होते. सांगलीच्या पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांचे पथक आणि गुन्हे शाखेचे पथक एकत्र तपास करत होते. विशाल फाळके हा खेड शिवापूर येथे येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले.
विशाल फाळके हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी तासगाव, सिंहगड रोड, वारजे, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी व शस्त्र बाळगणे असे ८ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, पोलीस हवालदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, निखिल जाधव, विजय पवार, नागनाथ राख, विनोद चव्हाण, राहुल शिंदे, अमोल सरडे, संजय आबनावे, प्रमोद कोकणे व पुष्पेंद्र चव्हाण यांनी केली आहे.