कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी घाट रस्ता यात्रेकरूंसाठी ५ जानेवारी पर्यंत बंद
भोर : पुढील महिन्यात मांढरदेवी (ता. वाई) येथील श्रीकाळूबाई देवीची यात्रा होत आहे. या पार्श्वभूमीवर कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी ५ जानेवारीपर्यंत हा रस्त यात्रेकरूंसाठी बंद ठेवण्यात आला आहे. प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.
कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट रस्ता करण्याचे काम सुरू आहे. या कामाला वाहनांचा अडथळा निर्माण होत असल्याने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग यांच्या मागणीनुसार कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी रस्ता ५ जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली आहे.
श्री क्षेत्र मांढरदेवी श्रीकाळूबाई देवीची यात्रा १२ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीत होणार आहे. या यात्रेसाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. सदर यात्रा कालावधीमधील काळेश्वरीदेवीच्या दर्शनासाठी भोर, आंबाडेमार्गे आंबाडखिंड घाटातून देवीला जाणार्या भाविकांची संख्या मोठी आहे. सद्य:स्थितीमध्ये भोर ते मांढरदेवी रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट रस्ता करण्याचे काम सुरू आहे.
सदर रस्त्याचा बहुतांश भाग हा नादुरुस्त असून, घाटात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना झालेल्या नाहीत. रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. आंबाडखिंड घाट मांढरदेवी प्रारंभपर्यंत सिंगल रोड आहे. घाट प्रारंभ ते घाटमध्य भागापर्यंत रोडचे काम केलेले नाही. घाटाच्या मध्यभागी नवीन रोडचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी एकाबाजूने वाहतूक सुरू आहे. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते. त्याठिकाणी संरक्षक कठडे नसल्याने अपघाताची शक्यता असल्याने यात्रेकरूंसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे.