रोटरी प्रांत ३१३१ च्या १३५० किलोमिटर हमसफर कार रॅलीचे खेड शिवापूर येथे रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टच्या वतीने वाद्यांच्या गजरात स्वागत
खेड शिवापूर : रोटरी प्रांत ३१३१ प्रत्येक वर्षी समाजातील गरजू लोकांसाठी करोडो रूपये खर्च करत असते. यादरम्यान रोटरी प्रांतपाल शितल शहा यांच्या पुढाकाराने समाजातील विविध ठिकाणच्या समस्या समजून घेण्यासाठी तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यान्वित करण्यासाठी ७ दिवसांची कार रॅली काढण्यात आली. त्यामध्ये “१ चमच कम, ४ कदम आगे”, “अवयव दान” याबाबत जनजागृती करण्यात आली. या कार रॅलीत २२ कारसह ७६ रोटेरियन्सनी सहभागी झाले होते.
या कार रॅलीची सुरुवात शनिवारी(दि. १४ डिसेंबर) रोजी शिर्डी येथून करण्यात आली होती. यांनतर ही कार रॅली पुढे जात मुंबई, अलिबाग, नाशिक, कोल्हापूर मार्गे ७ दिवसांचा प्रवास पूर्ण करत समारोप करण्यासाठी आज शनिवारी(दि. २१ डिसेंबर) खेड शिवापूर(ता. हवेली) येथे पोहोचली. या समारोप समारंभ प्रसंगी रॅलीतील सदस्यांचे रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टच्या वतीने वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टचे अध्यक्ष रो. अभय जोशी, प्रोजेक्ट चेअरमन नरेंद्र शहा, को-चेअररमन मुग्धा लोहार, रो.रागिणी शहा, रो.डॉ संपदा जोशी उपस्थित होते. यावेळी प्रांतपाल शितल शहा यांनी सांगितले की या रॅलीच्या माध्यमातून आम्ही अनेक गावातील लहान थोर सर्व प्रकारच्या माणसांशी संवाद साधून त्यांच्यासाठी रोटरी तर्फे कोणते नवीन उपक्रम राबविता येतील याचा आढावा घेतला. तसेच महाराष्ट्र व गोवा राज्यातील रोटरीच्या प्रांतपालांना भेटून अनेक उपक्रम ऑर्गन डोनेशन एकत्र राबविण्याचे निश्चित केले.
कोणत्याही अडथळ्याविना कार रॅली संपन्न झाल्याबद्दल सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी प्रांत संचालक टीना रात्रा यांनी रॅलीतील अनुभव कथन केले. चित्रा देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच क्लब सचिव विनायक देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट चे मेंबर्स व अँन्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.